Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
तुळजाभवानी कारखान्यात ३० लाखांचा घोटाळा
१ हजार ७४९ साखर पोत्यांची अफरातफर
दि. ५ जुन २००६नळदुर्ग (शिवाजी नाईक) शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील गोडाऊनमधून १७४९ पोती साखरेची अफरातफर झाल्याचे प्रकरण
उघडकीस आले असून सुमारे तीस लाख रूपयांच्या या साखर घोटाळ्यामुळे संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील शेतकरी सभासद व सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे.
तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेली साखर कर्जापोटी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे नजरगहाण ठेवण्यात आली आहे. कारखान्यातील एकूण तीन गोडाऊनमध्ये सुमारे ७५ हजार २६९ पोती ठेवलेल्या साखरेपैकी ७३ हजार ५२० पोतीच साखर शिल्लक असून सुमारे १७४९ साखर पोत्यांची अफरातफर झाल्याचे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍याने १ जून रोजी केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीपूर्वी गोडाऊन क्र. १ मध्ये ५३ हजार ५२४ पोती साखर, क्रं. २ मध्ये १८ हजार ६५७ तर गोडाऊन क्रं. ३ मध्ये ३ हजार ८८ पोती साखर ठेवण्यात आली होती. त्यापैकी तपासणी पथकाने क्रं. ३ ची तपासणी केली असता, १७४९ पोती साखर कमी असल्याचे व माल अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. सन २००१-०२ मधील शिल्लक साखर गोडाऊन क्रं. ३ मध्ये होती. त्यामध्ये १७४९ पोती साखर कमी असल्याचे आढळून येताच बँक अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तातडीने पंचनामा केला असून या पंचनाम्यावर कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.बी. पाटील, गोडाऊनकिपन मोहन मोटे, प्रभार लेखाप्रमुख सतीश बोबडे, केमिस्ट डी.ए. जाधव, कारखाना बँक शाखेचे शाखाप्रमुख बाळासाहेब भागवत, बँकेच्या मुख्य कार्यालयातील बिगर शेती विभागाचे व्यवस्थापक एच.व्ही. भुसारे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
तुळजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा केंद्रबिंदू असलेला हा कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली तीन वर्षे बंद होता. या कारखान्यावर नाबार्डचे ३५ कोटी रूपयांचे कर्ज आहे. सन २००५-०६ यावर्षी आ. मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या केंद्र शासनाच्या पॅकेजमधून गळीत हंगाम सुरू करण्यात आला होता. त्यामुळे त्या भागातील शेतकरी व सभासदांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र वरील प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात चांगलीच खळबळ डडाली असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणी अद्याप चौकशी सुरू असून कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिगरशेती विभाग प्रमुख एच.व्ही. भुसारे यांनी याबाबतचा अहवाल सोमवारी याप्रकरणी होत असलेल्या बैठकीत वरिष्ठांकडे सादर करणार असून त्यानंतरच कारवाईबाबति निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या साखर घोटाळा गेल्या अनेक वर्षांपासुन सुरू असावा, असा अंदाज सभासदांतून व्यक्त केला जात आहे. उत्पादन शुल्क खाते व निबंधकाने केलेल्या तपासणीत ही तफावत कशी निदर्शनास आलीी नाही, याबाबतही उलटसुलट चर्चा आहे. कारखान्याचे अध्यक्ष सि.ना. आलुरे गुरूजी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, कारखान्याची साखर बँकेकडे गहाण असून बँकेने केलेल्या तपासणीचा अहवाल अद्याप आपल्यालीा मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. गोडाऊनवर नियंत्रण असलेले व गोडाऊनच्या चाव्या सध्या ताब्यात असलेले बँकेच्या कारखाना शाखेचे शाखाधिकारी बाळासाहेब भागवत यांच्याशी संपर्क साधला असता, ते शाखेत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण राजकीय दबावापोटी दडपले जाणार की दोषींवर कारवाई करणार? याकडे तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

0 comments:

Post a Comment