Breaking News
Loading...
Sunday, November 10, 2013

Info Post
नळदुर्ग कडकडीत बंद : दोन एस.टी. बसेसना आग
स्वातंत्र्य तालुक्याची मागणी फेटाळल्याची संतप्त प्रतिक्रिया  आंदोलकाच्या मृत्युने तणाव
                                                                                       दि. १४ मे १९९९
नळदुर्ग, दि. १३ (शिवाजी नाईक यांजकडून) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या २८ नव्या तालुक्यांच्या यादीत ‘नळदुर्ग’चे नाव नसल्याने शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असुन सकाळी १० वाजल्यापासुन राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९ वर रास्ता रोको करणार्‍या प्रक्षुब्ध जमावाने दुपारी २.३० च्या सुमारास दोन एस.टी. बसेसना आग लावल्याने तालुका निर्मितीच्या या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. अधिकार्‍यांपुढे आपल्या प्रक्षुब्ध भावना मांडत असतानाच विरेशप्पा डोंबे यांचे आकस्मिक यांचे निधन झाल्याने जमाव संतप्त झाला.
       दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुळजापूरचे तहसिलदार गव्हाणे यांनी भेट देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ए.पी. पाठक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दरम्यान, अधिकार्‍यांमुळे आपल्या प्रक्षुब्ध भावना व्यक्त करण्यासाठी उभे राहत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा कार्यकारण सदस्य अचानक कोसळल्याने त्यांचे आंदोलनस्थळीच आकस्मिक बलिदान झाले. जनसंघापासुन कार्यरत असलेल्या श्री. डोंबे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सायंकाळी चारपर्यंत आंदोलक कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आज सकाळपासूनच नळदुर्ग शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. नागरिकांनी आपले नित्याचे व्यवहार बंद ठेवून शासनाचा निषेध केला आहे. नवीन तालुक्याच्या यादीत नळदुर्गचे नाव नसल्यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्णय झाली असून सकाळी दहा वाजल्यापासुन व्यापारी बाजारपेठ बंद आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ व २ कि.मी. अंतरावर मोठमोठे दगड ठेवल्याने सोलापूर-हैद्राबाद-मुंबई मार्गावरील संपूर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. सकाळी दहा वाजता ५०० ते ६०० तरूणांच्या प्रक्षुब्ध जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९ वर येथील बसस्थानकासमोर हॉटेल्समधील बाकडे आडवे लावून व महामार्गावर ठाण माडूंन रास्ता रोकोस प्रारंभ केला. मार्गावरील सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोठमोठे दगड, विजेचे पोल, वीज मंडळाच्या तारा टाकून वाहतुक बंद पाडण्यात आंदोलकांनी यश मिळविले. बसस्थानकावर २० ते २५ बसेस थांबल्याने प्रवाशांचेही प्रचंड हाल झाले. शहराच्या दोन्ही दिशेने वाहने थांबल्याने लोकांचे जाणे-येणे पूर्णत: बंद झाले.
    दोन एस.टी. बसेसना आग
          तहसिलदारांपुढे आपल्या भावना मांडण्यासाठी पुढे जात असलेले विरेशप्पा डोंबे अचानक कोसळले. कार्यकर्त्यांनी त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. वडणे, डॉ. मुळे यांनी श्री. डोंबे यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. ही वार्ता शहरात तार्‍यासारखी पसरताच प्रक्षुब्ध झालेला जमाव राष्ट्रीय महामार्गाकडे पुन्हा धावला. नळदुर्ग-अणदूर रोडवरील गोलाईजवळ या जमावाने दोन एस.टी. बसेसना डिझेल टाकी फोडून आग लावली. स्वारगेट डेपोची पुणे-बिदर एमएच १२ युए ९२६४ व सोलापुर डेपोच्या सोलापूर-उमरगा एमएच १२, एफ ४५३० या दोन्ही बसेसच्या सर्व काच्या फुटला असून जळून खाक झाल्या आहेत.
        नळदुर्ग तालुक्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते विरेशप्पा डोंबे हे नळदुर्ग तालुका कृती समितीचे पदाधिकारी होते. गेल्या महिन्यातच त्यांनी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मुंबई येथे एका शिष्टमंडळासह भेट घेतली. संभाजीनगर येथे भाजपचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही डोंबे यांनी केले होते. १९५० पासून जनसंघाचे कार्यकर्ते असलेले श्री. डोंबे यांनी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या बरोबरीने कार्य केले. सर्वांना मार्गदशृन करणारा हा ज्येष्‍ठ नेता तालुक्याच्या निर्मितीसाठी आंदोलन करतानाच काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डोंबे हे येथील श्री स्वामी समर्थ अर्बन को-ऑप, बँकेचे ज्येष्ठ संचालक होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मराठवाडा संघटक ऍड. मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख नरसिंग जाधव, शाम पवार, कमलाकर चव्हाण आदींनी शोक व्यक्त केला आहे.
       दुपारचारपर्यंत एकही आंदोलक माघार घ्यायला तयार नव्हता. सर्वश्री भास्करराव मोहरीर, काशिनाथ घोडके, सुर्यकांत पाटील, राजकुमार मोरे, राजकुमार डुकरे, राजा ठाकुर, चॉंद काझी आदींनी आंदोलकांना विनंती केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

0 comments:

Post a Comment