Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
...आणि पाटील तांड्याने उचलला विकासाचा विडा!
वाटा विकासाच्या... भाग-२
दि. २२ डिसेंबर २००५
 नळदुर्ग (शिवाजी नाईक) : जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातुन एका वर्षात पाटील तांड्याने विकासात्मक भरारी मारली. विकास कामाचा एक विडाच या गावानी उचलल्याचे येथील कार्यावरुन दिसून येते. जलस्वराज्य प्रकल्प चालू असतानाही तांड्यावर हातभट्टी दारु गाळणं चालूच होते. मात्र विकासाच्या वाटेवर मोठा दगड होऊन बसलेल्या या दारूभट्टीला दूर करण्यात गावकर्‍यांचा निर्धार महत्वाचा ठरला.
     या गावातील एकुण ५५ घरे व घर तेथे शौचालय ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने बांधून काढले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेने सदस्य गणेश सोनटक्के यांनी ११ व्या वित्त आयोगातुन दोन लाख रूपये खर्चाचे एक सभागृह बांधून दिले. तर जिल्हा परिषदेच्यावतीने अडीच लाख रुपये खर्चाचे एक बहुउद्देशीय कार्यालय बांधण्यात आले. जलस्वराज्य प्रकल्पाकरिता जिल्हा परिषदेकडून सुमारे ७ लाख ५० हजार रूपये या ठिकाणी खर्च करण्यात आले असून यामध्ये विहिरीचे खोदकाम, जलवाहिनी टाकणे, पाण्याची टाकीबांधकाम इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. पाटील तांड्यातील महिलांनी सेवालाल महिला दूध व्यवसायाची स्थापना केली आहे. दूध व्यवसायाच्या विकासासाकरिता जागतिक बँकेतून २ लाख रूपये व बँक ऑफ इंडिया अणदूर शाखेकडून ६ लाख रूपये असे मिळून सुमारे ८ लाख रूपये मिळाले. त्यातून ४० जर्सी गायी खरेदी करण्यात आल्या आहेत. येथील दूध घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा तुळजाभवानी प्रक्रिया दूध महासंघाची गाडी दररोज येते. दररोज दीडशेपेक्षा अधिक लिटर दूध या महासंघास दिले जाते. या दुग्ध व्यवसायातुन महिन्याकाठी चाळीस हजार रूपयांची उलाढाल होत आहे. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत आता कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. महिला सक्षमीकरण (बचत गट) स्वच्छता आदी कामे पूर्ण झाले आहेत. तसेच यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतर्गंत गटार योजना, अंतर्गत रस्ते, नाईकनगर एस.टी. थांबा ते पाटील तांडा अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनांतर्गत ३२ हजार रूपये खर्चाची पाण्याची टाकी व जनावरांसाठी पाण्याचा हौद, जनावरांसाठी निवारा आदी कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षामध्ये जलस्वराज्य प्रकलल्प अभ्यास समितीने पाटील तांडा येथील महिला बचत गट, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता समिती व ग्रामस्थ यांनी भेट दिली. येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या कामाबाबत प्रशंसा उद्गार काढले. महाराष्ट्र राज्य जलस्वराज्य प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण दराडे, जागतिक बँकेचे प्रतिनिधी आर.आर. मोहन, संपूर्ण स्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्य समन्वयक मल्लिनाथ कलशेट्टी, उषा महेश्वरी महिला विकास तज्ज्ञ राज्यस्तरीय महाराष्ट्र, मुंबई, चंद्रपूर जि.प. चे समुदाय विकास तज्ज्ञ बंडू हिरवे, प्रकल्पाचे वरिष्ठ सहाय्यक सुनिल जोगी, भूगर्भ तज्ज्ञ डॉ. उमरीकर, जागतिक बँकेचे सल्लागार तथा आरोग्य तज्ज्ञ डॉ. पटनाईक एस. आरोग्य तज्ज्ञ सुमित पाटील, डॉ. नितीश झा, मुंबईचे डॉ. मनोज वर्मा आदी प्रमुख मान्वरांच्या यामध्ये सहभाग होता. उस्मानाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत केरूरे यांनी या गावास वारंवार भेट देऊन मार्गदर्शन करीत आहेत.

0 comments:

Post a Comment