Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
आलुरे गुरूजी व ना.चव्हाण यांचा आज गौरव        
                                                                            दि. १० नोव्हेंबर २०००
शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मराठवाड्यातील एक समाजसुधारक व शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरूजी यांना तुळजापूर भूषण व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. मधुकरराव चव्हाण यांना सहकार महर्षी ही उपाधी व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
     तुळजापूर भूषण हा पुरस्कार समता सामाजिक विकास संस्था, तुळजापूर या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले, अशा व्यक्तींना दर पाच वर्षांनी सन्मानपत्र व दहा हजार रूपयांचा पुरस्कार देऊर गौेरव केला जातो. पहिला तुळजापूर भूषण पुरस्कार मिळविण्याचा मान सि.ना. आलुरे गुरूजी यांना मिळत आहे. तसेच मधुकरराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली. त्या कार्यासाठी त्यांना याच संस्थेतर्फे सहकार महर्षी ही उपाधी व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. एकाच गावच्या (अणदूर) या दोन सुपुत्रांना अशा प्रकारच्या सन्मान मिळण्याचा हा दुग्धर्करा योग आहे. पूर्वी असे योग आले आहेत. सन १९८५ साली एकाच गावच्या या दोन उमेदवारांना एकाच पक्षामार्फत वेगवेगळ्या विधानसीा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती. दोघांनाही आमदार होण्याची संधी मिळालेली आहे. आज दोघेही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई या बँकेचे संचालक आहेत. अशा प्रकारच्या दुर्मिळ योग महाराष्ट्रातील क्वचितच एखाद्या गावाला मिळालेला असेल. या दोघांनाही युरोप, अमेरिका खंडातील देशांना अभ्यास दौर्‍यावर जाण्याची संधी मिळाली. अणदूर या गावच्या दोन सुपुत्रांची अणदुरचा व तालुक्याचा लौकिक महाराष्ट्रात झाला.
      मराठवाडा मागासलेला आहे. त्यात तुळजापूर तालुका बालाघाटच्या डोंगर माथ्यावर वसलेला कुसळी गवताचा म्हणुन उपहासाने या तालुक्याचा उल्लेख होत असे. आज या दोन नेत्यांच्या कर्तृत्वामुळे या तालुक्याचे भाग्य उजळले आहे. तालुक्यातील श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना, हेमवर्णा सुतगिरणी, श्री कुलस्वामिनी सुतगिरणी, भगिरथ खत कारखाना, खंडोबा पणन संस्था, शतिगृहे या सहकारी संस्थांच्या माध्यमातुन अनेक पाटबंधार्‍यांच्या योजना, रस्ते यामुळे तालुक्याचे आर्थिक चित्र पालटले आहे. हरितक्रांती झाली आहे. महाराष्ट्रात कृषी औद्योगिक समाज निर्माण व्हावा, हे महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाणयांचे स्वप्न होते. या स्वप्नाची बरीचशी परिपूर्ती तालुक्यात झाल्याचे दिसून येते.
     शैक्षणिक व सामाजिक दृष्टीनेही या तालुक्याची बरीचशी प्रगती झाल्याचे दिसून येते. आज या तालुक्यात शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर ता. तुळजापूर या संस्थेच्या २५ शाखा कार्यरत आहेत. त्यात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, रात्र शाळा, किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम, मुला-मुलींची वस्तीगृहे, पतसंस्था यांचा समावेश करता येईल. बालाघाट महाविद्यालय, नळदुर्ग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झालेली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूरमुळे तंत्रशिक्षणाची संधी सर्वांना उलपब्ध झाली आहे. नवोदय विद्यालय, तुळजापूर व सैनिकी शाळा तुळजापूर या विद्यालयांचा लाभ जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना मिळत आहे.
      शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. यावर श्रद्धा ठेवुन महात्मा जोतीबा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरूजी, महात्मा गांधी व महात्मा बसवेश्वर यांच्यापासून प्रेरणा घेऊन सि.ना. आलुरे गुरूजी यांनी शिक्षण क्षेत्रात व सामाजिक जीवनात प्रदीर्घकाळ सेवा केली.
      मधुकरराव चव्हाण यांना अनेक थोर राजकीय व सहकारी चळवळीतील नेत्यांच्या सहवासाचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. कै. यशवंत चव्हाण, कै. वसंतदादा पाटील, कै. विष्णुअण्णा पाटील, कै. शंकरराव मोहिते-पाटील इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. या नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करीत त्यांनी सहकारी क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली. चव्हाण यांना शालेय उच्च शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण अनुभव, निरीक्षण आणि चिकाटी यांंच्या बळावर घेतलेल्या शिक्षणाने माणूस किती पुढे जाऊ शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणुन त्यांचा उल्लेख करता येईल. इ.स. १९६२ मध्ये ते जिल्हा भू-विकास बँकेचे संचालक झाले. तेंव्हापासुन त्यांनी मागे वळुन बघितलेच नाही. राजकारणाच्या व सहकाराच्या क्षेत्रात त्यांचे पाऊल सदैव पुढेच राहिले. १९६७ मध्ये तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती, १९७३ मध्ये सभापती येथून वाटचाल करीत राज्य व देशातील सहकारी क्षेत्रातील उच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली. उस्मानाबाद जिल्हा भू-विकास बँकेचे चेअरमन, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केंटिंग फेडरेशनचे अध्यक्ष, नॅशनल असोसिएशन फॉर स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक नवी दिल्लीचे अध्यक्ष, नाबार्डचे संचालक, दफळी नवी दिल्ली या संस्थेचे संचालक, सहकारी मुद्रणालय पुणेचे संचालक, तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, खंडोबा पणन सहकारी संस्थेचे संस्थापक, भगिरथ खत कारखान्याचे संस्थापक. कुलस्वामिनी सुतगिरणीचे अध्यक्ष इतकी पदे त्यांनी भूषविली. सध्या ते मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, औरंगाबादचे अध्यक्षपद भूषवित आहेत.
     तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. तालुक्यात तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना हे प्रगतीचे केंद्र आहे. मागील संचालक मंडळाच्याकाळात हा कारखाना कर्जबाजारी झाला. आज चव्हाण, आलुरे गुरूजी यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. दोघेही कारखान्याचे संचालक आहेत. या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना प्रगतीकरीत राहील अशी लोकांची श्रद्धा आहे. हे संचालक मंडळ अधिकारावर आल्यापासुन कारखान्याचे बरेचसे कर्ज फेडले. कामगारांचा थकीत पगार दिला. त्यांचा नियमित पगार सुरू झाला. गेल्या गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन केले. यावरुन लोकांच्या आशा, अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.
- नळदुर्ग प्रतिनिधी

1 comments: